- चाकण – तळेगाव रस्त्याच्या डागडूजीला सुरुवात..
- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- चाकण – तळेगाव रस्ता एमआयडीसीमुळे शहराच्या नकाशावर अतिशय महत्वाचा मार्ग म्हणून अधोरेखित झालेला आहे. देशातील महत्वाच्या नामांकित कंपन्या तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या ह्याच रस्त्याच्या बाजूला स्थापित झालेल्या आहेत. दरोरोज हजारो कामगार याच रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. या महत्त्वपूर्ण रस्त्याची दुर्दशा झाली होती. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती. खड्यांमुळे चालक त्रस्त झाले होते. अ खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झालेली होती. दोन वर्षापासून प्रशासन रस्त्याच्या दुर्दशेकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होते. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. माध्यमांच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडली. अखेर प्रशासनाला जाग आली आणि नुकतेच पीडब्लूडी च्या वतीने चाकण तळेगाव रस्त्याचे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले.
म्हाळुंगे, खराबवाडी, एच पी चौक परिसरात रस्त्याची खूपच खड्डेमय दुर्दशा झाली होती. तेथील कामाला सुरुवात करण्यात आली. मेसर्स खोसे कंपनीला रस्त्याचे काम देण्यात आले असून ६ महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “चाकण तळेगाव रस्ता हा चाकण औदयोगिक क्षेत्रातील महत्वाचा दळणवळण मार्ग असून हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यामुळे खूपच दयनीय अवस्थेत पोहचला होता. पावसाळ्यात तर ह्या रस्त्यावरून जाताना वाहनांना कसरत करावी लागत होती. अनेक वाहने या खड्ड्यामुळे नादुरुस्त होत होती. हा रस्ता दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम खात्याने हिरवा कंदील दाखवला त्यामुळे आता वाहन चालवताना कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळेल. रस्ता हा एकपदरी असून सद्यस्थितीत त्यावर मोठा ताण पडत आहे. दुपदरी रस्ता केल्यास अपघातांना आळा नक्कीच बसेल. प्रशासनाने तातडीने हालचाल करून रस्त्याची रुंदी वाढवणे खूप गरजेचे आहे. रस्ता दुरुस्त करताना कामाचा दर्जा उत्तम असणे आवश्यक आहे. अभियंत्यांनी या बाबींवर गांभीर्याने लक्ष द्यावे.”