न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- पाळीव प्राणी विक्री व पाळीव प्राण्यांचे खाद्य विक्रीचा चांगला अनुभव आहे, असे आरोपीने फिर्यादीच्या पतीला सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. व्यवसायात १ वर्षासाठी पैसे गुंतविल्यास रकमेच्या ५ टक्के रक्कम महिन्याला व्यवसायातील फायद्यापोटी परतावा देईन, असे अमिष दाखवले.
दरम्यान फिर्यादीने त्यांच्या अकाऊंटमधुन तसेच त्यांचा मुलगा व पती असे तिघांच्या अकाऊंटमधुन आणि रोख रक्कम अशी एकुण २९,८०,००० रुपये आरोपीच्या व्यवसायामध्ये गुंतविले. व्यवसायामधुन होणा-या फायद्यापोटी तो देणार असलेली रक्कम १ वर्षापर्यंत एकदाही आरोपीने फिर्यादी यांना दिली नाही. दिलेली रक्कम देखील माघारी दिली नाही. फिर्यादी यांनी दिलेल्या रक्कमेचा आरोपीने अपहार करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
ही घटना एप्रिल २०१८ ते मे २०१९ दरम्यान सेक्टर २६, प्लॉट नं-२२९, निगडी प्राधिकरण येथे घडली. ५० वर्षीय महीलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी रोहीत रमेश चौधरी, (रा. मुकाई चौक, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















