न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२२) :- भारत माता की जय आणि भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील संविधानावर आधारीत कार्यक्रमांची सुरूवात झाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी प्रभाग अध्यक्ष सागर आंघोळकर, शशिकांत कदम आणि जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या माजी सभापती उषा मुंढे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, माजी नगरसदस्या वैशाली जवळकर, माजी स्विकृत सदस्य महेश जगताप, बुद्धभूषण सेवा संघाचे अध्यक्ष पुनाजी रोकडे, सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लोकरे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जांभुळकर, बाळासाहेब देवकर, अशोक आल्हाट, चंद्रकांत बेंडे, शशिकांत दुधारे, साई कोंढरे, पंचशीला दुधारे, रेखाताई दूधभाते आदी उपस्थित होते .
तदनंतर उपस्थितांनी भारतीय संविधान दिनाच्या प्रास्ताविकेचे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित
करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत, अशा आशयाचे सामुहिक वाचन केले.
यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील शहीद अधिकारी, जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात ख्यातनाम गायक संकल्प गोळे, धीरज वानखेडे आणि मंजुषा शिंदे यांनी संविधानावर आधारित “घटनेच्या पहिल्या पानावरती” “दोनच राजे इथे जन्मले” “माझ्या भीमाचे नाव हाय रं” “कोटी कोटी मुखे आहे” “लई बळ आल” आदी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकले. मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शहर वासियांना सुभेच्छा देण्यात आल्या.
















