न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- भोसरीतील पुणे नाशिक हायवेवर कै. अंकुशराव लांडगे सभागृहापासून भोसरी सहल केंद्राच्याकडेने फुगे आळी, भोसरी गावठाण कडून आळंदी रोड कॉर्नरपर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ अतिशय संथगतीने सुरु आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे.
भोसरी सहल केंद्राच्या भिंतीच्या कडेने मोठा ७-८ फुटी पदपथ असताना पुन्हा त्याच्या विरुद्ध बाजूस गावठाणातील रहदारी वस्तीच्या बाजूनेही मोठा पदपथ बांधून जाण्या-येण्यासाठी रस्ता छोटा ठेवला जात आहे. ज्यामुळे मोठा त्रास सुरु झाला असून वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्याही उद्भवली आहे.
गावठाणातील रहिवासी भागाकडे पुन्हा मोठ्या पदपथची अजिबात गरज नाही. यामुळे तेथील नागरिकांना रस्त्यावर आपल्या गाड्या लावाव्या लागत आहेत व त्यामुळे रस्ता अजून छोटा झाला आहे. त्यामुळे तातडीने प्लॅन मध्ये बदल करावा व भोसरी गावठाण मधील फुगे आळी ते धावडे आळी या ३०० मीटर रहिवासी भागाकडे पदपथ न करता रोडच्या लेव्हलमध्ये सिमेंट ब्लॉक बसविल्यास येथे राहणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा त्रास होणार नाही व रस्ताही मोठा राहील. तसेच भोसरी गावठाणातील फुगे आळी ते धावडे आळी दरम्यानचा जुना मोठा बंदिस्त नाला साफ करण्यात यावा म्हणजे येथे चोकअप होणार नाही, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन अॅड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्तांना इमेलद्वारे पाठविले आहे.


















