- देहुरोड पडतेय दूर; स्थानिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- तळवडे भागातील नागरिकांना एखाद्या घटनेची तक्रार पोलिसांकडे करायची असेल, तर कोणाकडे द्यायची, कारण सध्या हा भाग दोन पोलिस स्टेशनला जोडलेला असल्याने संभ्रम आहे. देहूरोड आणि निगडी पोलिस स्टेशन अंकित असल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी लक्षात घेता, संपूर्ण तळवडे हे निगडी पोलिस स्टेशनला जोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ज्योतिबा चौकापासून त्रिवेणीनगरच्या दिशेने असलेला परिसर हा निगडी पोलिस स्टेशनला तर तळवडे गावठाणच्या दिशेची हद्द ही देहूरोड पोलिस स्टेशनला जोडलेली आहे. हा संपूर्ण एकच प्रभाग असून, सगळे क्षेत्र पिंपरी चिंचवड मनपात येत असल्याने शहर हद्दीत असलेल्या पोलिस स्टेशनला संपूर्ण तळवडे जोडले जाण्याची मागणी आहे.
सध्या या भागात रुपीनगरला चिखली पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस चौकी आहे. परंतु काही वेळेला नागरिकांना सात ते आठ किलोमीटर लांब असलेल्या देहूरोडला जाऊन तक्रार नोंदविणे भाग पडते. याशिवाय पारपत्र कामे, दाखले आदींसाठीदेखील देहूरोड भागात जाऊन काम करून घ्यायला दळणवळण आणि अंतराच्या हिशोबाने गैरसोय होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागाला शहर हद्दीत येऊन तेवीस वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही पोलिस क्षेत्र ग्रामीण भागाशी जोडले असल्याने, मनपा हद्दीत असलेल्या जवळच्या निगडी पोलिस स्टेशन हद्दीत सगळा भाग जोडण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
















