- भगवान महावीर-गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची बेरीजच आज मानवतेला सुरक्षित ठेवेल … डॉ. श्रीपाद सबनीस
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च) :- प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया यांच्या संत जीवनावर आधारित, असे अध्यात्मिक पुस्तक विचार वैभव या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कवी वानखेडे व वेदांत श्री. प्रकाशनचे सुनील गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाद सबनीस म्हणाले की, आणू युद्धाचा धोका संपूर्ण मानवी संस्कृतीला निर्माण झाला असताना जगाला वाचवनारा महाविरावा अहिंसावादी विचार आज सर्वांसाठी उपयुक्त आहे. अहिंसेशिवाय जगाची शांतता सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी महावीर, बुद्ध, गांधींची बेरीजच आज मानवतेला सुरक्षित ठेवते. विश्वात्मक मानव बहुधार्मिक संचित घेऊन जगतो आहे. त्यात जात आणि धर्माच्या ही अहंकारी विषाची पेरणी करणे पाप आहे. सर्व धर्मांची शुद्ध मूल्यात्मकता बेरजेत पचवून मानवता जगवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. अशोक पगारिया यांचे सर्व महापुरुषांच्या जीवनावरचे विचार वैभव हे पुस्तक निश्चितपणे पथप्रदर्शक आहे. हा विचार डॉ. सबनीस यांनी मांडला.
यावेळी वेदांत श्री प्रकाशनचे सुनील गायकवाड यांनी पुस्तकाच्या मांडणी विषयी माहिती दिली. तसेच लेखक डॉ. अशोक कुमार पगारिया यांनी पुस्तक निर्मितीची पार्श्र्वभूमी सांगून त्यामध्ये समाविष्ट असलेल्या संत महंतांची थोडक्यात माहिती सांगितली. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या पुस्तकाचा तपशीलवार परिचय करून देत असताना त्यांच्या सर्वधर्म समभावाची प्रशंसा केली. चंद्रकांत वानखेडे यांनीही आपल्या भाषणांमध्ये डॉ. पगारिया यांच्या ह्या साहित्यकृतीचे विवेचन करून त्यांना धन्यवाद दिले.
प्रकाश रोकडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बंधुता साहित्य संमेलनाचा उल्लेख करून २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. पगारिया यांची निवड झाल्याचे सांगून त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची निर्मिती महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले व कवी शंकर आथत्रे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सभागृहात साहित्य रसिक व अनेक समाजिक संस्थांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.











