- पिंपरी चिंचवड ठरलं प्रदूषणाची राजधानी?..
- स्वच्छ हवा धोक्याच्या उंबरठ्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराचा पर्यावरणीय चेहरा दिवसेंदिवस काळवंडत चालल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहनांची प्रचंड वाढ, वेगाने होणारे नागरीकरण, बांधकामांचा धुरळा आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे वायुप्रदूषणाने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ताथवडे, वाकड, चिंचवड आणि रावेत हे भाग प्रदूषणाचे कायमस्वरूपी ‘हॉटस्पॉट’ बनत असल्याची गंभीर नोंद अहवालात करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारत असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. मात्र शहराच्या वाढीला साजेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहू शकलेली नाही. परिणामी नागरिकांचा कल खासगी वाहनांकडे वाढत असून पेट्रोल-डिझेल वाहनांच्या वाढत्या वापरामुळे वातावरणात प्रदूषकांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रातील उत्सर्जन आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमधून उडणारी धूळ या समस्येला अधिक तीव्र करत आहे.
महापालिकेच्या निरीक्षणानुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेत ऋतूनुसार मोठा फरक दिसून येतो. पावसाळ्यात पावसामुळे धूळ आणि प्रदूषक खाली बसत असल्याने हवा तुलनेने स्वच्छ राहते. मात्र उन्हाळा आणि हिवाळ्यात धुळीचे प्रमाण, तापमानातील बदल आणि वातावरणातील स्थिरता यामुळे प्रदूषण झपाट्याने वाढते. विशेषतः वाहतूक आणि औद्योगिक हालचाली अधिक असलेल्या भागांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे.
अहवालात धूलिकण (Particulate Matter) हे शहरासमोरील सर्वात मोठे पर्यावरणीय आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांवरील धूळ, बांधकामांमधून होणारे प्रदूषण आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली आहे. नियमित रस्ते स्वच्छता, धूळ नियंत्रण, हरित उपक्रम आणि वाहतूक व्यवस्थापनावर अधिक भर देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र ऑक्टोबरपासून प्रदूषणात वाढ होत गेली. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान हवा ‘मध्यम’ श्रेणीत पोहोचली आणि या काळात AQI १९० पर्यंत नोंदविण्यात आला. यंदाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीतही हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ राहिली असून AQI १५८ पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. वाढते वायुप्रदूषण भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट ठरण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


















