- १.०८ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त; गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री झालेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत काळेवाडी पोलिसांनी दोन सराईत आरोपी आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेला १ लाख ८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल तसेच एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी मध्यरात्री १.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश करत मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. त्यानुसार कैलास अशोक खलसे (वय ४०, भारतनगर, पिंपरी), शुभम शांताराम दुबे (वय २७, थेरगाव) आणि एका विधिसंघर्षित बालकाचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही मालमत्तेविरोधी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव तसेच काळेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आणि तांत्रिक पथकाने संयुक्तपणे केली.

















