- विनापरवाना मद्य व खाद्यपदार्थ विक्री; महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २७ जुलै २०२६) :- हिंजवडी परिसरात विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवून विनापरवाना मद्य आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आस्थापनांवर हिंजवडी पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. या प्रकरणी संबंधित आस्थापनांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(क्ष) सह १३१ अन्वये खटले दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२६ जुलै) पहाटे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर आणि हर्षद कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी मोहीम राबवली. या वेळी ए१ लॉज अँड बार, विप्रो सर्कल, हिंजवडी तसेच इको क्लब अँड बार, द सोशल स्ट्रीट, हिंजवडी ही आस्थापने नियोजित वेळेनंतरही सुरू असल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी विनापरवाना मद्य व खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.


















