न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २७ जुलै २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोशी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतमाता चौक येथील रामकृष्ण बँक्वेट हॉलमध्ये माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम पार पडला.
या शिबिराला ग्रामस्थ, सोसायटीधारक, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रक्त तपासणी व रक्तदानासाठी मोठी गर्दी झाली होती. शिबिरात सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली. त्यापैकी एकूण १७३ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. तसेच रक्तदात्यांसाठी अल्पोपहार, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी वसंत बोराटे यांनी सांगितले की, गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि युवकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रक्तपेढीचे डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.


















