- आजच SIR फॉर्म भरून मतदानाचा हक्क सुरक्षित करा..
- भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच मतदारांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- इंद्रायणीनगर, (दि. २७ जुलै २०२६) :- भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने जुलै २०२६ पासून राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर १, २, ३, ४, ६, ७, ९, १०, ११, १२, १३ तसेच गुरुविहार, जयगणेश आणि लांडेनगर परिसरातील सर्व पात्र मतदारांनी तातडीने SIR फॉर्म भरून आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करावे, असे आवाहन भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विलास हनुमंतराव मडिगेरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असून, यापूर्वी ज्या मतदान केंद्रावर (बूथवर) मतदान केले आहे, त्या बूथशी संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जाऊन SIR फॉर्म भरावा. SIR फॉर्म न भरल्यास भविष्यात मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कोणताही विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी.
फॉर्म भरण्यापूर्वी शक्य असल्यास ECINET वरील “Search in Last SIR (2002)” या सुविधेचा वापर करून सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आई-वडिलांचे नाव शोधून भाग क्रमांक (Part No.) आणि अनुक्रमांक (Serial No.) नोंदवून ठेवावा. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. एक रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, विवाहित महिलांनी आवश्यक असल्यास पॅन कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्र (Gazette) किंवा इतर वैध पुरावे सोबत आणावेत. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीमार्फत सर्व सदस्यांची कागदपत्रे सादर करता येणार आहेत. आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आजच SIR फॉर्म भरा आणि आपल्या कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील इतर मतदारांनाही या मोहिमेबाबत जागरूक करा,” असे आवाहन विलास मडिगेरी यांनी केले.


















