- मुख्य अभियंता पदे रद्द करून शहर अभियंता संवर्गाची पुनर्रचना करण्यास महापौरांची मंजुरी..
- मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना शहर अभियंता-१ आणि सह शहर अभियंता मनोज सेठीया यांना शहर अभियंता-३ पदावर पदोन्नती देण्याची शिफारस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ४ वर नगरसेवकांनी उपसूचना मांडत शहर अभियंता व मुख्य अभियंता पदांच्या पुनर्रचनेची मागणी केली. महापौरांनी ही उपसूचना मंजूर केल्याने या प्रस्तावाची चर्चा रंगली आहे.
उपसूचनेनुसार, महापालिकेतील मुख्य अभियंता-१ व मुख्य अभियंता-२ ही स्वतंत्र पदे रद्द करून त्यांचे शहर अभियंता संवर्गात विलीनीकरण करण्यात यावे. त्यानंतर शहर अभियंता-१, शहर अभियंता-२ आणि शहर अभियंता-३ अशी तीन समकक्ष पदे निर्माण करून त्या पदांवर सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, या प्रस्तावातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे सेवा प्रवेश नियमांमध्ये दुरुस्ती होण्यापूर्वीच कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या पदावर नियुक्त करायचे, याचा उल्लेख उपसूचनेत करण्यात आला आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळण्याच्या अधीन राहून विद्यमान मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना शहर अभियंता-१ आणि सह शहर अभियंता मनोज सेठीया यांना शहर अभियंता-३ पदावर पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सेवा प्रवेश नियमांमध्ये दुरुस्ती करण्यापूर्वीच विशिष्ट अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेची शिफारस उपसूचनेत करण्यात आल्याने या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापौरांनी उपसूचना मंजूर केल्याने आता सेवा प्रवेश नियमांमध्ये बदलासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निर्णयामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत नवे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















