न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ५ मार्च) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाची मासिक बैठक आज मंगळवार (दि. ५) रोजी पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. चिखली-मोशी परिसरात महापालिकेच्या वतीने अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यात रस्ते व विविध विकासकामांचा समावेश आहे. परंतु, या विकासकामामुळे कुदळवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
यादव पुढे म्हणाले की, महापालिकेने लाखो रुपये खर्चून रस्त्याची कामे केली आहेत. परंतु, महापालिकेच्या वतीने या रस्त्यांची कितीही वेळा साफ-सफाई केली, तरीही दिवसभरात धूळ व माती या रस्त्याच्या व दुभाजकाच्या कडेला जमा होत आहे. त्यामुळे रस्ता दुभाजकाच्या कडेला जमा झालेली माती वाहनांच्या व नागरिकांच्या आरोग्य समस्या निर्माण करीत आहे.
त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असून, काही वेळा मातीची धूळ उडून अपघाताचीही शक्यता बळावत आहे. महापालिकेच्या वतीने रस्ता दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती हटवण्यासाठी ठोस कार्यवाही करावी. जेणेकरून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या व वाहतूकीस अडथळा निर्माण करणारी समस्या नाहीशी होईल.
तसेच दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती ही मनपाच्या उद्यान विभागासाठी वापरली जाऊ शकते. त्यासाठीही कार्यवाही करावी, अशी मागणी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी या बैठकीत केली आहे.