- यशस्वी संस्था व टाटा मोटर्स यांच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी युवक – युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे असून याद्वारेच सशक्त युवा पिढी घडेल असे मत टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाच्या कर्मचारी संबंध विभागाचे उपमहाव्यवस्थापक पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केले यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स व टाटा मोटर्स सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करताना ते आज पुण्यात बोलत होते.
शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की, एकीकडे नोकरीच्या संधीचे प्रमाण कमी होत असताना कौशल्य विकास उद्योजक घडविण्याची संधी कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारेच उपलब्ध होत आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या यशस्वी संस्थेद्वारे व टाटा मोटर्सच्या सीएसआर अंतर्गत गरजू युवक – युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास या युवकांमध्ये दिसत आहे. टाटा उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यशस्वी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले बेकरी पदार्थ व नवनवीन आकर्षक ड्रेस पाहिल्यावर विद्यार्थ्यांनी सुद्धा खूपच चांगला प्रतिसाद प्रशिक्षणाला दिला असल्याचे जाणवत आहे, असेही पांडुरंग पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या प्रमुख सल्लागार स्वाती दुधाळे यांनीही त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. अपर्णा देशपांडे, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे, टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे समन्वयक लीतेश आतारडे,लर्निंग लिंक फाउंडेशनच्या समन्वयक स्मिता गोगटे, यशस्वी संस्थेच्या श्री संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्रप्रमुख प्राची राऊत, यशस्वी संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या ईशा फाटक, प्रशिक्षक गणेश साळवे, प्रशिक्षिका रेखा कापसे, मीनाक्षी हिरेमठ, विद्यार्थी समुपदेशिका अश्विनी कांबळे, स्वाती घाडगे यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फॅशन डिझायनिंग कोर्सच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक वेशभूषेच्या फॅशन शो ने उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षिका रेखा कापसे यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आपले अनुभव व्यक्त केले.