न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी मिळणारी पेन्शन नवीन वर्षापासून दरमहा देण्याचे नियोजन आहे, असे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी बुधवारी (दि. २१) सांगितले.
शहरातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके, रमेश मुसुडगे, क्षेत्रीय अधिकारी सुचित्रा पानसरे, शीतल वाकडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, राजेश आगळे व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
पालिकेच्या वतीने दर तीन महिन्यांनी पेन्शन दिली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांची गैरसोय होत होती. त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेऊन उपायुक्त इंदलकर यांनी वरील ग्वाही दिली. तसेच, दिव्यांगांच्या पेन्शनसह पालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये काळानुरूप बदल करणे, दिव्यांगांचा ऑफलाइन घरो-घरी सर्व्हेक्षण करणे, दिव्यांगांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, दिव्यांगांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे यासंदर्भात चर्चा झाली.















