- प्रधान सेवकाला व एनडीए सरकारला मतदार घरी बसवतील – विशाल वाकडकर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) राफेल विमान खरेदी कराराची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असतानाही चोरीला गेली कशी? या करारातून देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे यापुर्वीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने राफेल कराराची कागदपत्रे जाणून बुजून सर्वोच्च न्यायालयात सादर केली नाहीत. हि बाब म्हणजे देशातील सव्वाशे कोटी जनतेशी पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारने केलेली प्रतारणा आहे. या करारात विमानांच्या किंमती बाबत विरोधी पक्षांचा व जनतेचा संशय खराच आहे हे यातून सिध्द होते. देशाच्या संरक्षणाशी संबंधित हि घटना असून जनतेच्या विश्वासाला यामुळे तडा गेला आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.
पाच वर्षांपुर्वी संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पाय-यांवर नतमस्तक होऊन मी पंतप्रधान नसून या देशाचा ‘प्रधान सेवक’ आहे, असे सांगितले होते. युपीए सरकारने केलेल्या राफेल खरेदी करारात किंमत व विमान खरेदी संख्येत अनावश्यक बदल करुन, अंबानीच्या कंपनीला फायदा होणा-या तरतूदी करुन नविन करार केला.
या कराराबाबत संसदेची व सर्वोच्च न्यायालयाची सरकारने फसवणूक केली आहे. या प्रधान सेवकांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशा भ्रष्टाचारी व फसव्या प्रधान सेवकाला व जनतेचा विश्वासघात करणा-या एनडीए सरकारला आगामी निवडणूकीत मतदार घरी बसवतील, असेही विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.











