न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’ या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआर महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, एआयसीटीई, पर्सिस्टंट कंपनी आणि नोडल सेंटर भुवनेश्वर यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या (पीसीसीओईआर)च्या धर्मराज शर्मा, श्रीपाद आगाशे, अभिषेक बाभुळकर, शुभम फाळके, ऋतुजा गुगळे, सुप्रिया कुदळे या संगणक विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी रस्ते व परिवहन मंत्र्यालयाने दिलेल्या प्रश्नावर अँड्रॉईड ॲप बनविले. या संगणक प्रणालिचा उपयोग राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गांवर आपत्कालीन परिस्थितीत छोटे मोठे पुल उभारण्यासाठी होणार आहे.
या मोबाईल ॲपला जिओटेक्निकल पॅरामिटरर्सचे इनपुट देऊन संबंधित माहिती दिल्यावर जसे की, पूल बांधणी करता लागणारे स्टील, सिमेंट यांची ग्रेड व स्वॉईल बेअरिंग कपॅसिटी इ. प्राथमिक माहिती भरल्यानंतर पुलाच्या विविध भागांचे डिझाईन क्षणार्धात मिळते. या सॉफ्टवेअर मुळे पूलांचे व रस्त्यांचे डिझाईन बनविण्यासाठी लागणारा वेळ, पैसा, श्रम यांची बचत होईल. तसेच रस्ते विकासाचा वेग कैक पटीने वाढेल. पीसीसीओईआरच्या या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, संगणक विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक, स्थापत्य विभागाचे प्रा. आकाश गुंजाळ, प्रा. सुदर्शन बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेच्या समन्वयक प्रा. अच्चुत खरे, प्रा. विजयालक्ष्मी कुंभार यांनी काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.











