न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- पिंपरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी व मूळ मालकांना सुपुर्द करण्यात आला. महाराष्ट्र पोलिस रेझिंग डेनिमित पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या निगडी येथील मुख्यालयात मंगळवारी (दि. १०) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळाल्याचे पाहून काही महिलांना आनंदाश्रू अनावर झाले. आमच्या सौभाग्याच्या लेण्यासाठी पोलिसांनी तपास केला. खाकीतील भावाने मिळवून दिलेला हा दागिना मौल्यवान आहे, असे म्हणून त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहीया, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.
पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण ८४ गुन्ह्यांतील ३३ लाख ४३ हजार २४० रुपये किमतीचे ६७९ ग्रॅम ५९० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने व ७३९ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच दोन लाख ४८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाइल फोन, २० हजारांचा लॅपटॉप, ५१ लाख ५० हजारांची चारचाकी व दुचाकी अशी एकूण २१ वाहने, सहा लाख ७० हजारांच्या सहा रिक्षा, ३७ लाख ५७ हजार ७६५ रुपयांचे टायर व ट्यूब व दोन लाख २१ हजार १०० रुपयांचा इतर मुद्देमाल, असा एकूण एक कोटी, ४६ लाख ९३ हजार ७०५ रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना पोलिस आयुक्त चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलिस आयुक्त चौबे म्हणाले, गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करताना पोलिस अधिकारी व अमलदार यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तपास करावा लागतो. आरोपीस अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा लागतो. तपासासाठी परराज्यामध्ये असताना पोलिसांना अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरीसुद्धा पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करून आरोपी व त्याच्या साथीदारांकडून मुद्देमाल हस्तगत करून आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. पोलिस सेवेसाठी तत्पर आहेत.
दरम्यान अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
















