न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- मासुळकर कॉलनी येथील महापालिकेच्या नेत्र रुग्णालयात येत्या महिना अखेरपर्यंत नेत्ररोग विभाग सुरू केला जाणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक हालचाली सुरू झाल्या आहेत. रुग्णालयातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. रंगरंगोटी व किरकोळ कामे सध्या सुरू आहेत.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर रुग्णसेवेचा पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये नवीन रुग्णालये सुरू केली. भोसरी रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि आकुर्डी रुग्णालयासाठी नव्या इमारती उभारल्या. तसेच, ही रुग्णालये सुरू देखील केली. त्यापाठोपाठ आता मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात वायसीएमचा नेत्ररोग विभाग हलविण्याचे नियोजन केले आहे.
नेत्ररोगावरील आंतररुग्ण विभागातील उपचारासाठी पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी दहा खाटांची क्षमता असणारे वॉर्ड सध्या सुरू केले जाणार आहे. त्यानंतर ही क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवित ८० खाटांपर्यंत नेली जाणार आहे. त्याचप्रमाणे, बाह्यरुग्ण विभागात २०० रुग्ण तपासता येतील, अशी व्यवस्था असणार आहे.