- अतिरिक्त १०० एमएलडी पाण्याचे काय झालं?..
- उन्हाळा वेशीवर; शहरातील नागरिकांना जाणवतेय पाणीटंचाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- अजून उन्हाळा सुरूही झाला नाही आणि शहरात अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेषत: उच्चभ्रू परिसरात हा तुटवडा जाणवत असून अनेक सोसायट्यांना आतापासूनच पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा झाले आहे. पण, पाणी उचलण्यास सुरू आहे. साडेतीन वर्षात महापालिका नव्याने पाण्याचा स्रोत निर्माण करु शकली नाही. पालिका सध्या मावळातील पवना धरणातून दिवसाला ५१० एमएलडी पाणी उचलत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्याकरिता निघोजे बंधारा येथे अशुद्ध जलपसा केंद्र उभारले आहे. त्यासह जलशुद्धीकरण केंद्राचे कामही पूर्ण नसून उद्घाटन रखडले आहे.
पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी सांगितले की, शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दिवसाला ५ ते १५ पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. शहराची लोकसंख्या ३० लाख ग्राह्य धरली. तरी, एका व्यक्तीला दर दिवसाला १६० ते १७० लिटर पाणी मिळाले पाहिजे. आत्ता ५० लिटरही पाणी मिळत नाही. मग, महापालिका उचलत असलेले ५१० एमएलडी पाणी कुठे जाते. चिखलीतील सदनिका असलेल्या सोसायटीला ५ टँकर लागत आहेत. १ टँकरचा खर्च हजार रुपये येतो. दिवसाला ५ हजार रुपये एका सोसायटीला येत आहे. जास्तीचा भुर्दंड सोसायट्यांना सहन करावा लागत आहे. महापालिकेने कर घ्यावा. मात्र, त्याप्रमाणे सुविधा द्याव्यात.
चिखली मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले की, सध्या काही गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये पाण्याची थोडी समस्या जाणवू लागली आहे. काही सोसाट्यांमध्ये एक ते दोन पाण्याचे टँकर मागवले जात आहेत. पण, मार्च, एप्रिल मध्ये पाणी समस्या जाणवेल. बोअरवेल कोरडे पडल्यानंतर पाणी समस्या तीव्र होते. आंद्रा धरणातून पाणी उचलणे कशासाठी अडले. लवकरात लवकर निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलले पाहिजे. उद्घाटनाची प्रतीक्षा न करता निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलावे.
“महापालिका पवना धरणातून दिवसाला ५१० एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० असे ५४० एमएलडी पाणी उचलते. पाणी उचलण्यात कोणतीही कपात केली नाही. अजून उन्हाळा सुरू झाला नाही. तक्रारींची दखल घेऊन काय समस्या येत आहेत, हे तपासले जाईल ”.
– श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता…