न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी चिंचवडला चार चौघी या प्रसिध्द नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न, समस्यांवर आधारित सविस्तर चर्चाही होणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सकाळी ११ वाजता हा गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्यासह चारचौघीचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार राज काझी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आकांक्षा पिंगळे, आय. आर. एस. माधुरी गरुड, राज्य काव्य पुरस्कार प्राप्त संगीता झिंजूरके यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिशा सोशल फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.