न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- आदर्शनगर- मोशी येथील वीजवाहिन्या धोकादायकपणे उघड्यावर न ठेवता भूमिगत करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
आदर्शनगर येथील मोर्य कॉलनी येथील स्थानिक नागरिकांना धोकादायकपणे वीजपुरवठा घ्यावा लागत होता. त्यामुळे या वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. याबाबत ‘परिवर्तन हेल्पलाईन’ वर तक्रार प्राप्त झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार कामाला गती देण्यात आली, अशी माहिती ‘परिवर्तन’चे समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली.
महावितरणच्या मोशी शाखेअंतर्गत ‘डीपीडीसी’योजने अंतर्गत केबल व मिनी फिडर पिलर टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना घरांवरुन किंवा उघड्यावरुन वीज कनेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सुमारे ७०० रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
आ. महेश लांडगे यांचं सूचनेननुसार माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह चंद्रकांत तापकीर, सचिन तापकीर, राजू सस्ते, वंदना आल्हाट आणि महावितरणचे अधिकारी रमेश सूळ यांच्या उपस्थितीत मिनी फिडरच्या पीलरचे भूमिपूजन करण्यात आले.