न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- नेत्र उपचारासाठी समर्पित रुग्णालयाची उभारणी करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्यावत सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारच्या समर्पित रुग्णालयामुळे नागरिकांना नेत्र उपचाराच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून सर्व घटकातील नागरिकांना या सेवा निश्चितपणे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याची सुरुवात सकाळी दहा वाजता मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील आरक्षण क्र. ८५ येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलच्या लोकर्पणाने झाली. त्यानंतर पत्रकारांसमवेत श्री. पाटील यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नेत्ररोग विभाग येथे स्थलांतरित होणार असून त्याकरिता ८० खाटांची व्यवस्था तसेच ४ शस्त्रक्रिया विभाग येथे तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण रुग्णालयासाठी २५ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च झालेला आहे. शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था वाय सी एम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे नेत्ररोगाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील उपलब्ध होणार आहे. सामान्य नेत्ररोग निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान शस्त्रक्रिया, पापण्यांचे आजार, लासरू शस्त्रक्रिया, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रेटिना तपासणी व उपचार, डोळ्यातील दाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरील उपचार, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व बालपणातील अंधत्व याबाबतचे उपचार, दृष्टिहीनांना कमी दृष्टी सहायकाबाबतच्या सुविधा आणि उपचार, डोळ्यांशी संबंधित सामुदायिक जागरूकता तपासणी आणि उपचार या सुपर स्पेशालिटी सेवा नेत्र रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयाचे लोकार्पण आज करण्यात आले.
प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानसभा सदस्य महेश लांडगे, विधानसभा सदस्या अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी नगरसदस्य मंदाकिनी ठाकरे, राजेश पिल्ले, समीर मासुळकर, माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे आदिंसह महापालिकेचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी गवळीमाथा आणि कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प येथे उभारण्यात आलेल्या कचरा स्थलांतर प्रकल्पा॑चे उद्घाटन देखील पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पामुळे स्थानिक भागातील कचरा एकत्रित गोळा होऊन कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा कॉम्पॅक्ट करून हुक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेण्यात येणार आहे. प्रत्येक कचरा स्थलांतर केंद्राची क्षमता २०० मेट्रिक टन असून ओला व सुका कचरा वाहतूक करण्यासाठी वाहनासह एक हूक लोडर व ३ कंटेनरची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार असून इंधन बचत, हवेचे प्रदूषण कमी होणे, कचऱ्याची गळती कमी होणे आदी फायदे होणार आहेत. ४ ठिकाणी उभारण्यात येणा-या या कचरा स्थलांतर प्रकल्पांच्या स्थापत्य विषयक कामांसाठी दोन प्रकल्पांकरीता ९ कोटी ९१ लाख रुपये तर इतर दोन प्रकल्पांकरीता ८ कोटी १२ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मशिनरी व विद्युत विषयक कामांसाठी १८ कोटी ६५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानसभा सदस्य महेश लांडगे, विधानसभा सदस्या अश्विनी जगताप, प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.व्ही. कांबळे, एम.एम.शिंदे, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, उमेश जाधव, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी नगरसेवक माऊली थोरात, महापालिकेचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
















