न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने तब्बल १३०० थकबाकीदारांना कर न भरल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. कर थकीत असलेल्या १२०० मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा एप्रिलमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत कर न भरणाऱ्या नागरिकांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे. तसेच कर न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीची कारवाई एप्रिल महिन्यामध्येदेखील सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागाने या आर्थिक वर्षामध्ये एक हजार कोटी रुपये वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी विभागाने चालू वर्षात मागील विक्रम मोडत तब्बल ७५० कोटींचा कर वसूल केला आहे. वर्षभरामध्ये नागरिकांना विविध सोयी, सवलती, प्रबोधनात्मक अभियान राबवून कर वसुली करण्यात आली. मात्र, तरीदेखील काही नागरिकांनी प्रतिसाद न देता कर भरला नाही, अशा थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई केली आहे. तब्बल १३०० जणांना विभागाने नोटीस बजावली आहे. तर १२०० जणांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
वर्षभरात कर संकलन विभागाच्या ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करून नागरिकांना प्रत्येक सेवा युजर फ्रेंडली देण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे घरबसल्या कर भरता येत असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सारथी हेल्पलाइन अंतर्गत मालमत्ता कर विभागासाठी २४ बाय ७ मदत कक्ष कार्यरत आहे. त्याचबरोबर करामध्ये महिला, दिव्यांग तसेच पर्यावरणपूरक सोसायट्यांना सवलती देण्यात आल्या. त्यामुळे विभागाने या आर्थिक वर्षामध्ये ७५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
महापालिकेने प्रामाणिक करदात्यास करामध्ये विशेष सवलती दिल्या आहेत. तसेच थकबाकीदारांना दंड ठोठावून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली. दंड आकारण्यात आलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. अनेक मालमत्तांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. सध्या एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची नावे प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यासाठी लागणारा निधी उभा करणे हे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळे नागरिकांनी कराचा भरणा करून, शहराच्या प्रगतीला हातभार लावणे आवश्यक आहे. थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग…