न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२३) :- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाचा कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी सात वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आई माउलीचा उदो. उदो., आई आयलो.च्या नामघोषांनी अवघा कार्ला गड दुमदुमला होता. पालखी मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, तालुका प्रशासन व नवनियुक्त विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत ‘आई राजा उदो उदो’चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवीची चैत्री यात्रा व पालखी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस व कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. मोठ्या श्रद्धेने व मनोभावे भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागांच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते.