- प्रशासनाचा वेळकाढूपणा कुणाच्या पथ्यावर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- चिखली जलशुद्धीकरण केंद्राची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ती कामे आटोपली की, तात्काळ केंद्राचे उद्घाटन करून शहराला १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाईल, असा नवा दावा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे.
आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यावरून दररोज १०० एमएलडी पाणी महापालिका उचलत आहे. त्यासाठीची पाणीपुरवठा विभागाच्या सर्व यंत्रणेची तयारी ऑक्टोबर २०२२ ला पूर्ण झाली आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, उद्घाटनासाठी राज्याचा नेता उपलब्ध होत नसल्याने एप्रिल महिना उजाडला तरी, १०० एमएलडी पाणी अडून पडले आहे.
उन्हाळा वाढल्याने शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पालिकेचे नेत्र रुग्णालय व कचरा ट्रॉन्सफर सेंटरचे उद्घाटन मागच्या महिन्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांच्या हस्ते शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन का करण्यात आले नाही, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. शहरात पाण्याची ओरड असताना अतिरिक्त १०० एमएलडी पाणीबाबत पालिका प्रशासन जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याबद्दल समाविष्ट गावकऱ्यांसह शहरभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्प सादर करताना त्यासंदर्भात आयुक्त सिंह म्हणाले होते की, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्धीकरण वेळ यंत्रणा, शहरातील जलवाहिन्या जोडणे, व्हॉल्व्ह, पाणीपुरवठा व्यवस्थापन आदींची चाचणी पूर्ण झाली आहे. मार्च अखेरीस पाणीपुरवठा सुरू होईल. आता तेथील कामे अपूर्ण असल्याचा नवा दावा आयुक्त करीत आहेत. कामे झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चुकीचे सांगत असल्याचेही ते म्हणाले. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच पाणी दिले जाईल, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. केंद्राच्या उद्घाटनासाठी नेते उपलब्ध होत नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.


















