- महापालिकेने मागाविले नागरिकांचे ऑनलाईन अभिप्राय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- दापोडी ते निगडी वाहतुकीच्या दृष्टीने परिवर्तनाच्या मार्गावर आहे. शहरीकरण व नागरिकरणामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवड आवश्यक झाले आहे. त्यादृष्टीने सकारात्मक नियोजन करून नजिकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक व मोटार विरहित वाहतुक व सर्व समावेशक पायाभूत सुविधा उभारण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.
दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्यावर सलग पादचारी मार्ग व सलग सायकल मार्ग या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्याबाबत स्थापत्य प्रकल्प विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यावरील सेवा रस्ता व आतील द्रुतगती मार्गासाठी वाहतुकीस सुरळीत व सुरक्षित प्रवेश करणे व बाहेर येणे यासाठी सुधारणा करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे.
त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून या सुविधा अंतिम करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी सद्यस्थितीतील Merge in (मर्ज इन सेवा रस्त्यावरुन द्रुतगती मार्गावर प्रवेश करण्यासाठीची सुविधा) & Merge out (मर्ज आऊट द्रुतगती मार्गावरून सेवा रस्त्यावर प्रवेश करण्यासाठीची सुविधा) व त्याचे नव्याने प्रस्तावित नियोजन याचे सादरीकरण महानगरपालिकेच्या Website व स्मार्ट सिटी Website App येथे पाहण्यास उपलब्ध आहे.
नागरिकांनी याबाबत त्यांचे अभिप्राय महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in, सारथी अॅप, स्मार्ट सिटी brts@pcmcindia.gov.in, projects@pcmcindia.gov.in यावर प्रसिद्धीपासुन १० दिवसांच्या आत द्यावेत, असं आवाहन स्थापत्य प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद अभासे यांनी केले आहे.
















