- तब्बल आठ वर्षांनी जबाबदार अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- डॉ. राजशेखर अय्यर यांच्यावर आठ वर्षांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनातील १० टक्के भाग पुढील ५ वर्षांसाठी कायमस्वरुपी रोखून ठेवण्याची कारवाई आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केली.
वायसीएम रुग्णालयासाठी एचबीओटी मशीन खरेदीच्या निविदा प्रक्रियेस डॉ. अय्यर यांनी स्वतः अधिकारात मान्यता दिली. मशिन खरेदी करण्यापूर्वी निविदेस व्यापक प्रसिद्धी दिली नाही. या अनियमतेतस जबाबदार धरत डॉ. अय्यर यांची ८ सप्टेंबर २०१५ रोजी विभागीय चौकशी सुरू होती. चौकशी अधिकारी डॉ. एस. बी. पानसे यांनी २६ मे २०१७ रोजी आयुक्तांना अहवाल सादर केला. चौकशीतील पाच आरोपांपैकी तीन आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदविला आहे.
डॉ. अय्यर यांनी दोषमुक्त करण्याची विनंती केली होती. आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी १४ जुलै २०१७ रोजी योग्य ती शास्तीची कारवाई करण्याची शिफारस केली होती. कर्मचारी सेवेच्या कालावधीत गैरवर्तणूक केल्याचे चौकशीत आढळल्यास कारवाई करता येते. त्यानुसार डॉ. अय्यर यांच्यावर सिद्ध झालेल्या आरोपानुसार त्यांच्या अनुज्ञेय निवृत्ती वेतनातील १० टक्के भाग पुढील ५ वर्षांसाठी कायमस्वरुपी रोखून ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी मंगळवारी (दि. २) झालेल्या स्थायी समितीमध्ये मान्यता दिली.















