न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- देहू नगरपंचायत हद्दीत काही घरांच्या छतावर तर काही खासगी जागेवर असलेले पाच ते सहा मोबाइल टॉवर अनधिकृत आहेत. एकाही मोबाइल टॉवरची नोंद करण्यात आलेली नाही. अशा अनधिकृत मोबाइल टॉवरची माहिती देहू नगर पंचायतीच्या वतीने घेण्यात आली आहे. तसेच, अनधिकृत मोबाइल टॉवरच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस दिलेले मोबाइल टॉवर रहिवासी वस्तीत आहेत. एखादी दुर्घटना घडली, तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोबाइल टॉवर लावताना केलेल्या ड्रिलिंगमुळे इमारत खिळखिळी होते. तसेच, कमकुवत झालेल्या इमारतीवर बसविलेले टॉवर अतिवृष्टी, वादळे आदी नैसर्गिक आपत्तीत पडू शकतात. चुकीची वीजजोड झाली असेल तर आग लागण्याची शक्यता असते. तसेच, मोबाइल टॉवरसाठी लावण्यात आलेल्या विद्युत जनित्रामुळे शहरातील प्रदूषणामध्ये वाढ होत असल्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
मोबाइल टॉवरबाबत स्ट्रक्चर परवानगी असल्यास परवानगीची सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्यास संबंधित टॉवर बसविलेल्या मालकांना नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. मोबाइल टॉवरकरिता देहू नगरपंचायतीची रितसर परवानगी घेण्याकरिता स्ट्रक्चर अभियंता यांचे स्थैर्य तपासणी, मालकी हक्काची कागदपत्रे मोबाइल, टॉवर नकाशे सादर करण्याचे आवाहन नगरपंचायतने केले आहे. संबंधित मोबाईल टॉवर मालकांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. – संघपाल गायकवाड, बांधकाम अभियंता, देहू नगरपंचायत