- येत्या १० जूनला पालखीचे श्रीक्षेत्र देहूगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकड़े प्रस्थान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी येत्या १० जून रोजी श्रीक्षेत्र देहूगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकड़े प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदींनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची तीन टप्प्यात पाहणी पूर्ण केली.
या तीन टप्प्याच्या पाहणीत पालखी विसावा आणि पालखी सोहळा मुकाम स्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान अकलूजचे तहसीलदारदेखील देहू देवस्थानच्या विश्वस्तांसोबत होते.
या पाहणीत ज्या ज्या अडचणी आल्या. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सांगितल्या. त्याप्रमाणे पुणे जिल्हाधिकारी देशमुख यांनी ज्या ज्या समस्या येतात, अशा सर्व समस्या सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
सध्या उन्हाळा कडक असल्याने पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यासाठी पाण्याचे टँकर वाढवावेत, पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करण्यात यावीत. तसेच फिरत्या शौचालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी देहू देवस्थान संस्थानच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहू देवस्थानच्या मंदिराच्या वतीने रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व दिंड्यांना पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीबाबत पत्रद्वारे कळविण्यात येत आहे. रथाची चकाकी करणाऱ्या कारागिरांना पूर्वसूचना देण्यात आली आहे, अशी माहिती देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.
पालखी सोहळा प्रस्तानाला आता अवघा एक महिना राहिला आहे. पालखी सोहळ्याच्या अगोदरपासून वारकरी मोठ्या संख्येने देहूत दाखल होतात. त्यामुळे देहू गावातही वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी देहू नगरपंचायतीकडूनही तयारी सुरू आहे. साफसफाई आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी फिरती शौचायलेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.