न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२३) :- पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत अंतर्गत रस्त्याची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसरातील अनेक समस्या जैसे थे अवस्थेत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना रखडलेल्या कामांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यानुसार पिंपळे गुरवमधील अमृता कॉलनी, भीमाशंकर कॉलनीच्या दोन गल्ल्या, गणेशनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या गल्ल्यांमध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पाणी रस्त्यावर साठून राहत होते. अवकाळी पावसामुळेही या ठिकाणी पाणी रस्त्यावर साठून राहिले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता काम सुरू झाल्याने नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील कामे रखडलेल्या अवस्थेत होती. अक्षरशः नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत होती. जलनि:स्सारण नलिका, पावसाळी पाण्याच्या नलिका टाकण्यात आलेल्या आहेत, या ठिकाणी कुठेही पाणी साचून राहणार नाही. रस्त्यालगतच्या नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची समस्या सुटणार आहे.
पिंपळे गुरवमधील अमृता कॉलनी, भीमाशंकर कॉलनीच्या दोन गल्ल्या, गणेशनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. चिखलमय रस्त्यातून वाट काढावी लागत होती. याबाबत महापालिका आयुक्तांकडे सतत पाठपुरावा सुरू होता. आता पावसाळी गटारांची कामे पूर्ण करून अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांची समस्यांतून सुटका होणार आहे.
– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस…