न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च) :- भंडारा-गोंदीयातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.
या राजीनामापत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”मी युवराज भगवान दाखले शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तिरोडा-गोरेगाव विधानसभा. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचा मी राजीनामा देत आहे. आदरणीय साहेब तत्कालिन विदर्भाचे शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेना संपर्कप्रमुख भंडारा-गोंदीया निलेश धुमाळ यांच्या शिफारशीने समन्वय अरविंद नेहरकर यांच्यामार्फत मला वरील विधानसभेची संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आपली शिवसेना वाढविण्यासाठी दिली होती. माझ्या सद्सद विवेकबुद्धीने मी संघटना वाढीसाठी पुरेपुर प्रयत्न केलेला आहे.
परंतु, साहेब मावळ लोकसभेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी, मावळगड राखण्यासाठी मला या ठिकाणी मतदान गोळा करण्यासाठी तसेच मी बहुजन समाजातील मातंग समाजातला वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र शिपाई असल्याने, भविष्यात आपल्या मार्गदशनाखाली अखंड बारा-बलुतेदार समाज बांधवांचे नेतृत्व करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघातुन नियोजन करीत आहे. त्यामुळे मला तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदासंघात काम करण्यासाठी वेळ मिळत नाही. साहेब शिवशाही व्यापारीसंघाच्या माध्यमातून व्यापारीवर्गाच्या व सर्वसामान्य जनतेच्या सवेसाठी माझ्या सवंगड्यांच्या सोबत शिवसेना वाढविण्यासाठी सदैव कटिबद्द राहणार आहे,” असे या राजीनामापत्रात दाखले यांनी म्हटले आहे.
आगामी मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. त्यांना ताकद देण्यासाठी व भविष्यात पिंपरी विधानसभेच्या तयारीसाठी मी हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत मावळ लोकसभेतून खासदार बारणे यांना निवडून आणण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार असून, पुन्हा मावळमध्ये भगवा फडकावणार आहे, असे दाखले यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.