- शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या मार्गावर; शासनाकडून यादीला विलंब?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- बोगस परवाने घेऊन शिक्षण क्षेत्राची थट्टा करणाऱ्या शाळांचे बिंग फुटल्यानंतर महापालिकेतील शिक्षण विभागाकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शिक्षण संस्थाचालकांकडून कागदपत्रांच्या फाईली मागवून घेण्यात आल्या. ४२ सीबीएसई शाळांनी कागदपत्रांच्या फाईली जमा केल्या असून त्याची चौकशी करण्यासाठी विभागाकडून या फाईली राज्याच्या शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविल्या आहेत. चौकशीत बोगस कागदपत्रं आढळल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाणार आहे. मात्र, अडीच महिन्यांचा कालावधी उलटून देखील शहातील बोगस सीबीएसई शाळांची नावे जाहीर केली नाहीत.
पिंपरी-चिंचवडमध्ये (सीबीएसई) माध्यमाची एक आणि पुण्यात दोन शाळा बोगस प्रमाणपत्राच्या आधारे चालविल्या जात असल्याची माहिती उजेडात आली होती. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सीबीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रमाणपत्रांच्या फाईली संकलीत करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यावर शहरातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची माहिती संकलीत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल ४२ शाळांची कागदोपत्री माहिती राज्याचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. शाळा सुरू करताना संबंधित संस्थाचालकाने राज्य शासनाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी जी कागदपत्रे सरकारकडे जमा केली होती. ती कागदपत्रे आणि नुकत्याच संकलीत केलेल्या फाईलींची एकत्रीत तपासणी केली जाणार आहे. तपासणीत तफावत अथवा बोगस कागदपत्र आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई केली जाणार आहे. कदाचित त्या शाळेचा परवानादेखील रद्द केला जाऊ शकतो.
सध्या सर्वच शैक्षणिक संस्थामध्ये शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. शासनाने बोगस सीबीएसई शाळांची यादी आधीच जाहीर करायला हवी होती. पालकांना आता सीबीएसई बोर्डाच्या शाळांत प्रवेश घेताना प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शाळांच्या बोगस प्रमाणपत्रांची माहिती समोर आल्यानंतर शहरातील सीबीएसई बोर्डाच्या सर्व शाळांना परवानगी प्रमाणपत्र शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व शिक्षण संस्थांना तसे आदेश देण्यात आले होते. दुसरीकडे पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभागाने आदेश काढूनदेखील शाळा व्यवस्थापनाला तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. पालकांनी सीबीएसई बोर्डाच्या शाळांत प्रवेश घेताना शाळेचे परवानगीपत्र प्रवेशव्दारावर किंवा नोटीस बोर्ड लावले आहे याची खात्री करून मगच प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याच्या शिक्षण उपसंचालकांकडे सीबीएसई शाळांची कागदपत्रे पाठविली आहेत. ही कागदपत्रे खरी आहे की खोटी, त्यामध्ये कोणत्या त्रुटी आहे हे तपासण्याचे काम सुरू आहे. – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, पिं.चि. मनपा…