- वाढीव दरांच्या निविदेनांही मिळतेय मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १ हजार १९० घरे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १४२ कोटी ५७ लाखांची निविदा काढण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने सादर केलेल्या दरापेक्षा वाढीव दराने निविदेला मान्यता देत प्रशासकीय राजवटीमध्ये उधळपट्टी सुरू आहे. निविदा दरापेक्षा तब्बल २५ कोटी रुपये जास्त खर्च होत असतानाही संबंधित ठेकेदाराला प्रशासकांनी पायघड्या टाकत काम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कामामध्ये तब्बल २५ कोटी रुपये वाढीव खर्च होणार आहे.
मागील वर्षी या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. चालू बाजारभावापेक्षा जादा दराची निविदा प्राप्त झाली. त्यामध्ये निविदा स्वीकृत योग्य दराच्या तुलनेत ३.४३ टक्के ज्यादा दराने काम देण्यात येत आहे. सिमेंट, स्टील, कर्मचारी यांचे भाव वाढले आहे. त्यानुसार, वाजवी दर आहेत.
– रामदास तांबे, सहशहर अभियंता, पिपरी-चिंचवड महापालिका
शहरामध्ये च-होली व बो-हाडेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे काम सुरू आहे. रावेत येथील जागेचा वाद न्यायालयात असल्याने हे काम थांबलेले आहे. तर त्यानंतर आता डुडुळगाव येथील योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. डुडुळगाव येथील आरक्षण क्रमांक १/२३३, प्लॉट नंबर १०५ (पी). १०७ (पी). १०८ (पी), ११२ (पी) मध्ये आवास योजनेचा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पात १ हजार १९० घरांसाठी एकूण १४२ कोटी ५७ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. या निविदेत शांती कन्स्ट्रक्शन (गुजरात) यांनी १७३ कोटी ५८ लाख आणि यशोनंद इंजिनिअरिंग कंपनी यांनी १७६ कोटी रुपयांची निविदा भरली होती. यामध्ये शांती कन्स्ट्रक्शन या ठेकेदारी कंपनीने दर कमी करून १६७ कोटी ५० लाख ९८ हजार ८७० रुपये नवीन दर सादर केला.
या निविदेत दोनच ठेकेदारांच्या निविदा पात्र झाल्या. त्यामध्ये काम देण्यात आलेल्या ठेकेदारी कंपनीचा दरदेखील निविदा दरापेक्षा १७.४४ टक्के अधिक असून तब्बल २४ कोटी ९८ लाख रुपये जास्तीचा खर्च होणार आहे, तर महापालिकेने स्वीकृत योग्य दर १६२ कोटी २५ लाख २४ हजार १६३ इतका गृहीत धरला आहे. या स्वीकृत योग्य दरापेक्षाही ३.४३ टक्के ज्यादा दराने हे काम देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यानुसार १६७ कोटी ८२ लाख ७५ हजार ८३६ रुपये इतका खर्च आहे.