न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, लहान बालके यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. भोसरी येथे एका लहान बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने पुन्हा एकदा शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
भटकी कुत्री शहरात मोठ्या प्रमाणात असून यांच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा ही भटकी कुत्री रोडवर फिरतात त्यामुळे अनेक मोठे अपघात शहरात घडलेले आहेत. रात्रीच्या वेळी कुत्रे अंगावर आल्याने दुचाकीस्वार गाडी जोरात पळवतात त्यामुळे अपघात होत आहेत.
भटक्या कुत्र्यांना वेगवेगळे आजार असतात. तसेच अनेक कुत्री ही पिसाळलेली असतात. जर ही कुत्री लहान मुले, नागरिक यांना चावली तर यातून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा या रोगट कुत्र्यांमुळे विविध आजारांची निर्मिती होऊ शकते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेका देण्यात येतो. महापालिका त्यावर कोट्यवधी रुपये खर्च देखील करते. परंतु पशुवैद्यकीय विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. पशुवैद्यकीय विभाग आपल्या कामात कुचराई करत आहे. या विभागाच्या कामचुकारपणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे, असा आरोप AIMIM चे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.