न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) दिघी येथील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेच्या संचालक पदाचा पदभार डॉ. मकरंद जोशी यांनी गुरुवारी स्वीकारला.
आर अँड डीईचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असून या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांना अटक केली आहे. त्यानंतर संचालकपदाची जागा अद्याप रिक्त होती. मात्र आता डॉ. जोशी संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.
डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएच. डी. प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट २००० मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.












