- खोदकाम केल्यास आयुक्तांचा कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- शहरात १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोणत्याही प्रकारे रस्ते खोदकाम करू नये, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानंतरही रस्ते खोदकाम केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक आणि खासगी अशा सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी शहरात सातत्याने रस्ते खोदकाम केली जाते. त्यासाठी खोदकाम शुल्क भरून महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. तर पावसाळ्यात रस्ते खोदकाम पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित असते. मात्र, मागील काही वर्षात आवश्यक कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही खोदकाम सुरू होती. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान, यावर्षी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ मे ते १५ ऑक्टोबर या पावसाळ्यातील कालावधीत रस्ते खोदकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार शहरात १५ मेपासून रस्ते खोदकाम बंद करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. या कालावधीत रस्ते खोदकाम बंद ठेवण्यात यावे. खोदलेले रस्ते पुर्ववत करावेत. अपवादात्मक परिस्थितीत रस्ते खोदकाम करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी महापालिकेची मान्यता घेण्यात यावी. हे प्रस्ताव शहर अभियंता यांची पूर्वमान्यता घेऊन आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आदेशात म्हटले आहे.












