- नागरिकांना कामासाठी विनाअडथळा पायी चालत जाणे सोपे होणार आहे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- शहरातील नागरिकांना निवासस्थानापासून जवळच्या मेट्रो स्टेशन, बस स्टॉप, शाळा, महाविद्यालये, बँका आदी ठिकाणी कामानिमित्त पायी जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ‘हरित सेतू’ प्रकल्प राबविणार आहे. पहिल्या टप्प्यात निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ मध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. सध्या डिझाइनचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आवण हर्डीकर यांनी शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, अॅडव्होकेट्स, प्रोफेसर, बिल्डर्स, आर्किटेक्चर्स आदी विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींची कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये चर्चे अंती ‘हरित सेतू’ प्रकल्प प्रसृत झाल्याने त्यासाठी करावयाच्या बाबींवर विचार विनिमय झाला. आजअखेर ‘हरित सेतू’ प्रकल्प डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यावर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे.
हरित सेतू प्रकल्पांतर्गत ‘नर्चरिंग नेबरहूड’ पदपथ विकसित करण्यात येणार आहे. म्हणजेच नागरिकांना निवासस्थानापासून जवळच्या बस स्टॉप, मेट्रो स्टेशन, शाळा, नाट्यगृहे, मार्केट, बँका, पोस्ट ऑफिस, पोलीस ठाणे पालिकेची कार्यालये आदी ठिकाणी कामासाठी विनाअडथळा पायी चालत जाणे सोपे होणार आहे.
हरित सेतू प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या पदपथावर अतिक्रमण करण्यास प्रतिबंध घातला जाणार आहे. काही ठिकाणी झाडी तर काही ठिकाणी गजेबो रुफ तयार केले जाणार आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात पदपथावरून चालताना काही ठिकाणी सावली तर काही ठिकाणी गजेबो रुफचा आधार घेता येणार आहे. अतिक्रमण प्रतिबंधित असल्यामुळे नागरिकांना विनाअडथळा पदपथावरून चालत जाता येणार आहे.
‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून ‘हरित सेतू’ प्रकल्प विकसित करण्यासाठी निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ भागाची निवड करण्यात आली आहे. या भागात हा प्रकल्प विकसित केल्यानंतर संपूर्ण शहरात तो राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहनांचा वापर न करता चालत जाऊन अपेक्षित कामे करणे सोपे होणार आहे.
सध्या पेट्रोल, डिजेल, सीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाहन परवडेनासे झाले आहे. परिसरातील कामे पायी चालत जाऊन करण्याची इच्छा असताना अपेक्षित सुविधांअभावी ते शक्य होत नसल्याने नागरिकांचा कल अजूनही वाहन वापरण्यावर अधिक आहे. त्यामुळे ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत परिसरातील प्रशासकीय, बँकींग, शालेय, महाविद्यालयीन, प्रवासविषयक कामे पायी चालत जाऊन करता येतील. तसेच, नागरिकांना सायकलींग करण्याची सोय देखील उपलब्ध होणार आहे. वाहनांचा वापर कमी केल्यास इंधनाची बचत होईल. वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यात यश मिळेल. आरोग्य सुदृढ ठेवण्यास स्वच्छ ऑक्सिजन मिळेल. रोगराईपासून स्वतःला दूर ठेवणे नागरिकांना सहज शक्य होईल.
‘हरित सेतू’ प्रकल्पाचे डिझाईन बनविण्यासाठी मास्टर प्लॅनचे काम सध्या सुरू आहे. ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून निगडी प्राधिकरणातील सेक्टर भागात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत प्रकल्पाचे काम सुरू होईल. संपूर्ण शहरात काम करण्याच्या दृष्टीने रस्त्याचा सर्वे करून त्यावर स्वतंत्र पथकाद्वारे अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.
– बापू गायकवाड, प्रकल्प अधिकारी…












