न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर हे कामगार व उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. राज्यभरातील विविध कानाकोपऱ्यातून मजूर कामगार कामासाठी पिंपरी चिंचवड शहरात येतात. या शहरातील विविध भागातील बांधकाम, मजूर यांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना अडीच ते ३ किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांची पायपीट लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली होती. परंतु ही बस सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मागील शैक्षणिक वर्ष वाया गेले.
अगोदरच मजुरी काम करणाऱ्या पालकांची आपल्या मुलांना शिक्षण देण्याची इच्छा नसते. परंतु अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता तयार केली जाते. मात्र महापालिकेकडून दिली जाणारी बससेवा बंद असल्याने पालक आपल्या मुलांना चालत शाळेत पाठवण्यासाठी तयार होणार नाहीत. तसेच लहान मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालक एकट्या विद्यार्थ्याला इतक्या लांब शाळेत पाठवत नाहीत. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.
मोफत बस सेवा पुन्हा सुरु झाली तर, रावेत, पुनावळे, किवळे, मोशी, चिखली व शहरातील अन्य भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हिताचा विचार करून ज्या भागात मोफत बसेसची गरज आहे, अश्या ठिकाणी बस सेवा सुरु करावी, अशा आशयाचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ प्रदीप जांभळे पाटील व शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांना रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी दिले आहे.


















