न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मंगळवारी (दि. ६) उपशिक्षक मराठी माध्यम संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात ही बदली प्रक्रिया पार पडली. उपशिक्षक १५६, दिव्यांग चार आणि वैद्यकीय कारणास्तव बदलीस पात्र सात अशा एकूण १८७ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
यावेळी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त (१) प्रदीप जांभळे-पाटील, सहायक आयुक्त (शिक्षण विभाग) विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक परिषद, पदवीधर शिक्षक संघटना आणि अनुसूचित जाती-जमाती शिक्षक महापालिका आपला महासंघ या पाच संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या बदल्या करीत असताना शिक्षक कर्मचारी सद्यःस्थितीत ज्या शाळेमध्ये कार्यरत आहेत, त्या शाळेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा दिल्या नाहीत तर इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील १० शाळा संगणक प्रणालीद्वारे देण्यात येऊन, त्यातून शिक्षकांनी पर्याय निवडले होते. महापालिका सेवेत रुजू झालेल्या दिवसांपासून ही बदलीपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात आली होती. शिक्षक कर्मचाऱ्यांनी निवड केलेली शाळा सेवाज्येष्ठतेनुसार ऑनलाइन मार्फत देण्यात आली आहे. दिव्यांग आणि वैद्यकीय कारणास्तव बदलीस पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय कार्यालयातील सध्या कार्यरत असलेली शाळा वगळून इतर १० शाळांचे पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली होती, अशी माहिती सहायक आयुक्त विजय थोरात यांनी दिली.












