- उन्नतिच्या वर्धापन दिनानिमित्त बाल जत्रेचे आयोजन..
- विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींचा केला सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- जन्माला आल्यानंतर आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो, ही समर्पक भावना अंगी असेल तरच मनापासून केलेले कार्य समाजाच्या सार्थकी लागते. याच भावनेतून भिसे परिवार आहोरात्र समाजासाठी झटत आहे. उन्नतिच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचा मला हेवा वाटतो. हे सामाजिक कार्य अविरत ठेवल्यास समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.
पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जिजामाता उद्यानात लहान मुलांसाठी बाल जत्रा भरविण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होत्या. यावेळी भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रवि भेगडे, हभप शेखर महाराज जांभुळकर, हभप ऋषीकेश चोरघे, हभप आनंदा काटे, उमेश शेलार, जगन्नाथ काटे, विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे, शारदा मुंडे यांच्या हस्ते वैकुंठ रथाचे गमन करण्यात आले. आरोग्य शिबिरही घेण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पाच नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सलग 20 वर्ष नावाडी म्हणून काम करणारे धोंडिबा काटे, दशक्रिया विधी कार्य करणारे पांडुरंग वाळुंजकर, सुमारे 500 विवाह सोहळ्यांमध्ये सुत्रसंचालन करुन सेवा पुरवणारे सुनिल कुंजीर, लेखक- वक्ता- उद्योजक नामदेवराव जाधव आणि महादेव मंदिरात पन्नास वर्षे सफाई काम करणारे बाबुराव भालेकर या पाच व्यक्तींचा उन्नतिच्या वतीने सन्मान करण्यात आला.
आमदार महेश लांडगे म्हणाले, उन्नति सोशल फाऊंडेशनचे कार्य खूप मोठे आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कायदा सुव्यवस्थेचे पालन करत उन्नतिच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लोकांना घरपोच सेवा पुरवली. एवढेच नव्हे तर कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटविणारे व्यक्तीमत्व हे कुंदाताईंना म्हणावे लागेल. कारण, त्यांनी कोकण, कोल्हापूर भागात देखील समाजसेवेचे रोपटे लावले. त्यांच्या सामाजिक कार्यापासून हजारो तरुणांना प्रेरणा मिळाली. त्यांचे हे कार्य येणाऱ्या काळात नक्कीच सार्थकी ठरेल, यात शंका वाटत नाही.
उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे म्हणाल्या, समाजसेवा हे काही एकट्या दुकट्याचे कार्य नाही. उन्नतिने पाच वर्षापूर्वी समाजकार्याचे छोटेसे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष झाला असून पिंपळे सौदागरमधील शेकडो तरुण-तरुणी उन्नतीच्या माध्यमातून समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन काम करतात. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, दिनदुबळ्यांना मदतकार्य, गरजवंताला मदत करणे हेच आमचे कार्य असून आम्ही ते निस्वर्थपणे करत आलो आहोत. भविष्यातही हे कार्य अविरतपणे सुरुच राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही, असेही कुंदाताई म्हणाल्या.












