- या बँकेने दिलाय ‘यूपीआय’च्या माध्यमातून पैसे काढण्याचा पर्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची गरज भासणार नाही. ‘यूपीआय’च्या माध्यमातूनही आता पैसे काढता येतील. बँक ऑफ बडोदाने (बीओबी) या सरकारी बँकेने इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल’ (आयसीसीडब्ल्यू) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आयसीसीडब्ल्यू सुविधेद्वारे भीम यूपीआय आणि अन्य यूपीआय अॅप्लिकेशनचा वापर करणारे इतर बँकांचे ग्राहकही एटीएममधून पैसे काढू शकतील. बीओबीचे ग्राहक एका दिवसात दोन वेळा पैसे काढू शकतील. एका वेळी जास्तीत जास्त पाच हजार रुपये काढता येतील. आयसीसीडब्ल्यू’ सुविधा देणारी ही १ देशातील पहिली सरकारी बँक आहे.
नव्या सुविधेमुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीनेही लाभ होणार आहे. डेबिट कार्डशी संबंधित क्लोनिंग, स्किमिंग तसेच उपकरणाशी छेडछाडीद्वारे ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार रोखता येतील.
एका यूपीआय आयडीशी अनेक बँक खाती जुळली असल्यास ग्राहकांना त्यापैकी एक खाते निवडण्याचा पर्याय मिळेल. बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर ‘यूपीआय कॅश विड्रॉल’ पर्याय निवडा. रक्कम नोंदवा. एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड येईल. ‘आयसीसीडब्ल्यू साठीच्या अधिकृत यूपीआय ॲपद्वारे हा कोड स्कॅन करा. व्यवहार अधिकृत करताच पैसे बाहेर येतील.












