न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च) :- राष्ट्रवादीचे मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. रविवार (दि. २४) रोजी त्यांनी पिंपळे सौदागर येथील शिवार चौक परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला.
पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीने असंख्य विकासकामे केली आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामाच्या जोरावर शहराचा पार चेहरा बदलला आहे. आमच्या सत्ताकाळात मोठमोठी प्रकल्प आम्ही मार्गी लावली. परंतु, विरोधाकांच्या ते पचनी पडले नाही. त्यांनी नाही-नाही ते आरोप आमच्यावर केले व जनतेची दिशाभूल करून, सत्ता मिळवली. परंतु, आम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता शहरातील विकासांना प्राधान्य दिले. त्यामुळे पून्हा एकदा विकासासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय जनतेसमोर असल्याचे, पार्थ यांनी यावेळी सांगितले.
परिसरातील सोसायट्या व कॉलनीतील नागरिकांच्या आग्रहाखातर नगरसेवक नाना काटे आणि शितल काटे यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, सुनील काटे, विविध सोसायटीचे चेअरमन, खजिनदार आणि नागरिक उपस्थित होते.















