- देशभक्तीपर गीते, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी रंगवला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या शाळेच्या परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष संदीप काटे, मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, मान्यवर पाहुणे, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली.
विद्यार्थ्यांच्या दमदार आणि मनमोहक सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती तसेच भारतीय संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळाली. विविध कार्यक्रमांना उपस्थित मान्यवर आणि पालकांनी उत्स्फूर्त दाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अध्यक्ष संदीप काटे आणि मुख्याध्यापिका सौ. ज्योतिका मलकानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले बलिदान आणि जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी एकता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा संस्मरणीय ठरला.


















