- पिंपरी-चिंचवड शहरात हरित ऊर्जाला मिळतेय चालना, पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी महापालिकेने उचलले महत्त्वाचे पाऊल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला आधुनिक, आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात आलेले हे EV चार्जिंग स्टेशन नागरिकांसाठी तसेच महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच, वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करून शहरातील हवा अधिक स्वच्छ ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देणारे हे पाऊल ठरणार आहे.
यावेळी अभिषेक बारणे यांनी शहराच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात शहरात अशा पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
“पिंपरी-चिंचवडला आधुनिक आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी हरित ऊर्जेचा स्वीकार ही काळाची गरज आहे. EV चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून प्रदूषण विरहित वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. प्रदूषणमुक्त हवा, शाश्वत विकास आणि सक्षम पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत भावी पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड घडविण्याचा आमचा संकल्प आहे.”
– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.


















