- थकबाकीदारांना कर संवादात पालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- तक्रारदात्यांच्या मालमत्ता कराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांशी कर संवाद सुरू केला. महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी होणारा करसंवाद तिसऱ्या शनिवारी (दि. १७) पार पडला. त्याद्वारे करदात्यांना जून अखेरच्या सवलतींची माहिती देण्यात आली. ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोठ्या संख्येने करदात्यांनी प्रतिसाद दिला.
यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नागरिक आणि अधिकारी यांच्यातील थेटसंवादामार्फत अडचणींचा निपटारा करण्यात आला. नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या संधीचा आजपर्यंत शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. करदात्यांचे प्रश्न ऐकून त्यावर तातडीचा निपटारा, निरसन करून त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देऊन नागरिकांचा विभागाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम करसंवाद उपक्रमातून झाले. शनिवारी पार पडलेल्या करसंवादमध्ये नागरिकांनी विभागामध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी निरसन केले.
उपयोगकर्ता शुल्काबाबत नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा न केल्यास येत्या काळात विभागाच्या जप्ती मोहिमेला थकबाकीदारांना सामोरे जाण्याचेही यावेळी सूचित केले.त्याचबरोबर थकबाकीदारांना येत्या काळात प्रतिमाह दोन टक्क्यांचे विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचेहीसांगितले. मालमत्ताकराबाबत सवलतींचे आवाहन करण्यासाठी होर्डिंग्ज, पाम्लेट, येत्या रील्स स्पर्धा, सोशल मीडिया, रेडिओ जिंगल्स, रिक्षावरील जनजागृती करीत आहे.
अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधी पासून? अशा अनेक प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या प्रत्येक प्रश्नास देशमुख यांनी उत्तर देताना, सामान्य करात आगाऊ भरणा केल्यास ५ टक्के, ऑनलाइन कराचा भरणा केल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असणाऱ्या एका निवासी मालमत्तेस ३० टक्के, दिव्यांग ५० टक्के, माजी सैनिकांना १०० टक्के, एसटीपी व ऑनसाईट कम्पोस्टिंग यंत्रणा ५ टक्के व झिरो वेस्ट व एसटीपी प्लांटसाठी १० टक्के अशा सवलती आहेत. जूनअखेरपर्यंत मालमत्ताकराचा भरणा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गतवर्षी महापालिकेने ८२६ कोटींच्या वसुलीचा टप्पा पार केला. विभागातील कर्मचारी व शहरातील जागरूक नागरिक यांच्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू आणि पार करू शकलो. त्यामुळे ८१६ कोटींचा उच्चांक हे करदात्यांचे यश आहे. त्यामुळे चालू वर्षीही ज्या नागरिकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेतला नाही, त्यांनी ३० जूनपूर्वीच या सवलतींचा लाभ घ्यावा. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…


















