न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग डी. आर. ए. कन्सल्टंट एजन्सीवर मेहरबान असल्याचे स्पष्ट होत आहे. या एजन्सीची मोठ्या कामासाठी वारंवार थेट नियुक्ती केली जात आहे. या एजन्सीला सुमारे २४१ कोटींच्या नव्या पाणीपुरवठा कामांसाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
पालिकेचे पाणीपुरवठ्याचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा योजना, अमृत योजना आणि इतर प्रकल्पांमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. चोवीस तास पाणी देण्याच्या वल्गना करणाऱ्या पालिकेवर दिवसाआड पाणी देण्याची नामुष्की ओढविली आहे. त्यासाठी पालिका यंत्रणेबरोबर प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये घेऊन सल्ला देणाऱ्या एजन्सी देखील जबाबदार आहेत. पाणीपुरवठा विभागात विविध प्रकल्पांसाठी डीआरए ही सल्लागार एजन्सी आहे. कामांना विलंबासाठी या एजन्सीला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. तसे न करता पाणीपुरवठा विभाग त्याच एजन्सीला नवी मोठी कामे सोपविण्याचा घाट घालत आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या सुमारे २४१ कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी डीआरए एजन्सीची थेट नियुक्ती करण्यास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली. एजन्सीला निविदापूर्व व निविदा पश्चात कामांसाठी नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच, त्यांना निविदापूर्व कामांसाठी प्रकल्प खर्चाच्या ०.५ टक्के व निविदा पश्चात कामांसाठी १.४५ टक्के इतके सल्लागार शुल्क दिले जाणार आहे.


















