- उदघाटनाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे उपस्थित होते.
प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.
चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तू होती. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतिवीर चापेकर यांची पुरातन वास्तू नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १२ जून १९९७ रोजी क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, सन १९९७ मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्याअंतर्गत फाऊंडेशन करण्यात आले. दुस-या टप्प्याचे काम सन २००१ मध्ये करण्यात आले. स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तिस-या टप्प्याचे काम सुरू आहे.














