- माजी नगरसेविकेचा प्रशासनावर आरोप..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- च-होली गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शट डाऊनमुळे पाणीटंचाई जाणवत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, तर च-होलीचे पाणी अन्यत्र वळवले जात आहे किंवा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या भागात पाणीटंचाई जाणवत आहे, असा आरोप येथील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
चऱ्होली गावठाणासह बुर्डे वस्ती, सरपंच वस्ती, पठारे वस्ती, अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेज परिसर आहे. लोहगाव व निरगुडी रस्ता परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या चार दिवसांपासून घरात पाणीच आले नाही, अशा तक्रारी करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या भागाला मोशी प्राधिकरण पेठ क्रमांक चारमधील जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्या अंतर्गत मोशी, गंधर्वनगरी, डुडुळगाव, वडमुखवाडी व च-होली येथील टाक्यांमध्ये जलवाहिनीद्वारे पाणी साठविले जाते. च-होली गावठाणातील टाकी सर्वांत शेवटी असल्याने पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्या चार महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे.
या भागातील बहुतांश नागरिक विहिरी व बोअरवेलचे पाणी वापरत आहेत. या भागातील अनेक नागरिक शेतामध्येच घरे बांधून राहत आहेत. त्यांनी नळजोड घेतले आहेत. मात्र, त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने विहिरी किंवा बोअरवेलचे पाणी वापरावे लागते. टँकरच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने पिण्यास अयोग्य आहे. नळांद्वारे पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत
चऱ्होलीत वर्षभरापासूनच पाणी टंचाई आहे. प्रशासन जाणीवपूर्वक या भागातील पाणी इतरत्र वळवत आहे. अतिरिक्त पाणी देण्याचे गाजर दाखवण्यात आले. मात्र, अतिरिक्त पाणी मिळालेले नाही.
– विनया तापकीर, माजी नगरसेविका…
दोन दिवसांपूर्वी शहरात शट डाऊन घेण्यात आला होता. यामुळे च-होली भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या नाहीत आणि या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी अन्यत्र वळवण्याचा काही संबंध येत नाही. – रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग…

















