न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- दैनंदिन योगामुळे शरीर निरोगी राहण्यास व रोग मुक्त होण्यास मदत होते, तसेच शरीराला सकारात्मक उर्जा,उत्साह मिळतो यासाठी आपल्या दैनंदिन कामातून थोडा वेळ काढून सर्वांनी योगा करून आपले आरोग्य जपावे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी येथील मासुळकर काॅलनी येथील योग दिन कार्यक्रमात सहभागी होवून मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ,उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, क्रिडा अधिकारी अनिता केदारी तसेच जेष्ठ नागरिक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने व योग विद्या धाम, पिंपरी यांच्या सहकाऱ्याने शहरातील १४ ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२३’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ठिकाणी सकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा बॅडमिंटन हॉल, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन कोर्ट, चिंचवड येथील फत्तेचंद जैन स्कुल शेजारील पवनानगर बॅडमिंटन हॉल, भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, भोसरीतील आदर्श शाळेजवळील दिघी रोड परिसरातील बॅडमिंटन हॉल, गव्हाणे वस्ती बॅडमिंटन हॉल, चिंचवड मधील कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडीतील यमुनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल तसेच पिंपरीगाव येथील कापसे आळीतील काशिबा शिंगे बॅडमिंटन हॉल, थेरगाव येथील डांगे चौकातील मथाबाई डांगे बॅडमिंटन हॉल, संत तुकारामनगर येथील संत तुकाराम पुतळ्यासमोरील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील कै. काळूराम जगताप
बॅडमिंटन हॉल आणि नवी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानातील नवी सांगवी बॅडमिंटन कोर्ट या १४ ठिकाणी योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मदनलाल धिंग्रा मैदान येथील कार्यक्रमास आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे,माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी नगरसदस्य शंकर जगताप,राजू दुर्गे, अॅड. मोरेश्वर शेडगे, चंद्रकांत नखाते,माजी नगरसदस्या शर्मिला बाबर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,जेष्ठ नागरिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, खेळाडू मोठ्या संख्येने नागरिक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच इतर ठिकाणी देखील योग शिबीरात देखील नागरिकांनी सहभाग घेतला.














